श्री बड़े दादाजी

शिवजींप्रमाणे श्री दादाजी महाराज सनातन आहेत, आद्य आहेत | श्री दादाजी धुनिवाले यांच्या परंपरेत शिवजींप्रमाणे श्री बडे दादाजींच्या उत्पत्तीचा पुरावा नाही |
श्री गौरीशंकर महाराज फार मोठे शिवभक्त होते आणि ते काबुलचे पश्तो संत होते | त्यांचे रूप अतिशय विलक्षण होते | त्यांचे कान मोठे-मोठे, चेहरा तेजस्वी आणि कदकाठी अतिशय उंच होती |ते काबूलमध्ये शिवजींची आराधना करायचे आणि शिवजींच्या दर्शनासाठी व्याकूळ असायचे | जेव्हा त्यांना शिवजींचे दर्शन झाले नाही तेव्हा ते काबुलहून निघाले आणि विविध आश्रमांमध्ये जाऊन साधुसंतांशी त्याबाबत चर्चा केली | एका साधूने त्यांना सांगितले की ‘नर्मदा कंकर,सभी शंकर |’ (‘नर्मदेतील सर्व दगड, शंकर आहेत |’) १९ व्या शतकाच्या सुरुवातीला तरुण असतानांच नर्मदा व शिवजींना भेटण्यासाठी ते अफगाणिस्तानातून निघाले | नर्मदा तटावर गेल्यावर त्यांना कळाले की शिवजी तर नर्मदेच्या कोणत्याही तटावर मिळू शकतात म्हणून त्यांनी नर्मदा परिक्रमा सुरू केली |
ते साधूंच्या एका जथ्यात सामील झाले | ते चांगले प्रभावशाली व वेदांती असल्यामुळे लवकरच त्या समूहाचे महंत बनले | परिक्रमा करीत असताना अनेक साधू या समुहात सामील झाले आणि संख्या जवळजवळ 150 वर गेली | समूहातील सर्व जण आपला सर्व सामान ४०-५० घोड्यांवर लादून नर्मदेची एक परिक्रमा बारा वर्षात पूर्ण करीत असत | अशा तीन परिक्रमा पूर्ण झाल्या परंतु श्री गौरीशंकरजी महाराजांना शिवाचे दर्शन न झाल्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी समाधी घेण्याचा विचार केला पण त्यांनी हे कोणालाही सांगितले नाही | त्यावेळेस त्यांच्या समूहातील सर्वजण साइखेडा जवळ श्री श्री संघू येथे होते | दररोज सकाळी चार वाजता श्री गौरीशंकरजी स्नान करायला जात पण त्या दिवशी ते सकाळी साडेतीन वाजता उठून नर्मदेवर जायला निघाले |जसे त्यांनी आपले पाय नर्मदेत ठेवले तेवढ्यात मागून 3-4 वर्षाच्या मुलीने त्यांची करंगळी धरली आणि म्हणाली – “क्यों? डुबने जा रहा है? मरने जा रहा है?” ( काय? डुबायला जात आहे? मरायला जात आहे का?) गौरीशंकर जी महाराज विचार करायला लागले की मी समाधी घेणार आहे हे जर मी कोणालाही सांगितले नाही तर हे ह्या मुलीला कसे कळले? तेवढ्यात त्या मुलीने त्यांचे मनगट पकडले आणि म्हणाली- “अच्छा मानेगा नही , मरना चाहता है, डुबना चाहता है” (अच्छा ऐकायचं नाही का ? डुबू इच्छितो ? मरू इच्छितो ?) श्री गौरीशंकरजी यांनी विचारले,”तुम कोन?” (तू कोण आहेस?)तिने उत्तर दिले, “मैं नर्मदा |” (मी नर्मदा) श्री गौरीशंकरजी महाराज म्हणाले, “मैं नही मानता” (मला विश्वास नाही) आणि आपला हात सोडून पुन्हा पुढे जायला लागले तर त्या मुलीने पुन्हा त्यांचा हात धरला | यावेळेस तिचा हात मोठा झालेला जाणवला | श्री गौरीशंकरजी महाराज आश्चर्यचकित झाले व त्यांनी त्या मुलीला पुन्हा विचारले, “तुम कौन हो?” ( तू कोण आहेस ?) यावेळेसही तेच उत्तर मिळाल्यावर ते म्हणाले – “मैं नही मानता, आप अपना असली रूप दिखावो” (मला विश्वास नाही तुम्ही खरे रूप दाखवा) मग नर्मदामातेने त्यांना आपल्या खऱ्या आपादमस्तक दिव्यरूपाचे साक्षात दर्शन दिले आणि म्हणाली “देख यह जो तू करने जा रहा है यह कायरो का काम है| तू भूल कर रहा है, जो तेरी जमात मे केशव नाम (श्री बडे दादाजी) का युवा है वही भोलेनाथ है” | (तु हे जे करत आहे हे भ्याड लोकांचे काम आहे | तू चूक करीत आहेस | तुझ्या समुहात जो केशव नावाचा (श्री बडे दादाजी) तरुण आहे तोच भोलेनाथ शंकर आहे |) त्यांना विश्वास बसला नाही आणि ते पळत पळत परत गेले |
रस्त्याने जात असताना त्यांना आठवण आली की केशव खरंच विलक्षण दिसतो | समुहात चालत असताना केशव एकटाच सर्वांसाठी हलवा, मालपुवा आणि शिरा बनवतो आणि जर तूप कमी पडले तर नर्मदेचे पाणी कढईत टाकून शिरा, मालपुवा आणि खीर बनवतो आणि जेव्हा त्यांच्याजवळ तुप येते तेव्हा मग परत ते नर्मदेत टाकून देतो | श्री गौरीशंकरजी महाराज नेहमी विचार करायचे की केशवला काहीतरी सिध्दीप्राप्त आहे | पण तेच महादेव असतील असा विचार कधी त्यांच्या मनात आला नाही | त्या गोष्टीचा विचार करत करत ते आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि सरळ भांडारघरात गेले | तेथे केशव त्यांच्याकडे पाठ करून भांडी घासत होता | तेव्हा त्यास गौरीशंकरजीनी नाव घेऊन पुकारले तर केशवने मागे वळून श्रीगौरीशंकरजींकडे बघितले तर त्यांना केशवमध्ये शिवजींचे रूप दिसले | यावर श्रीगौरीशंकरजींचा विश्वास बसत नव्हता आणि पुन्हा पुन्हा ते आपले डोळे चोळत केशव कडे बघत होते | तरी त्यांना शिवजींचेच दर्शन होत होते | आता त्यांना थोडा थोडा विश्वास बसला | पण पूर्ण विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी नर्मदेचे स्मरण करून तिला आपला भ्रम दूर करण्यास विनंती केली ते म्हणाले, ” जैसे मैयाँ ने अपने पूर्ण रूप के दर्शन दिये, वैसे ही भोलेनाथ के दर्शन करावो”(जसे तुम्ही तुमचे पूर्ण रूपात साक्षात दर्शन दिले तसेच भोलेनाथांचे पण दर्शन करूवून द्या) त्यांच्या मनात असा विचार येताच नर्मदा प्रकट झाली आणि म्हणाली,” अच्छा तेरे को विश्वास नही होता है, छु के देख ले”(तुला विश्वास होत नाही आहे तर तू स्पर्श करून बघ) श्रीगौरीशंकरजी दोन पावले पुढे सरकले आणि त्यांनी चरण स्पर्श करताच श्रीकेशवजींनी (श्री श्री १००८ श्री बडे दादाजी) त्यांना आपल्या शिवरूपाचे पद्मासन मुद्रेत दर्शन दिले |
शैले शैले न माणिक्यं,
मौत्त्किकं न गजे-गजे|
साधवो न हि सर्वत्र,
चंदनं न वने-वने||

प्रत्येक पर्वतावर माणिक नसतो, प्रत्येक हत्तीच्या गळ्यात मोती सापडत नाही | प्रत्येक वनात चंदन भेटत नाही, त्याप्रमाणे असे गुरु सर्वत्र शोधूनही भेटत नाही |
गुरूंचे दर्शन होताच गौरीशंकरजींना अत्यानंद झाला |
श्री केशवजींनी त्यांना सांगितले की, “अब हमने आपको दर्शन दे दिये है, तो आप जमात को लेकर आगे जाओ” | (आम्ही तुम्हाला दर्शन दिले आहे, आता तुम्ही आपल्या समूहाला पुढे घेऊन जा)
श्री गौरीशंकरजी आपल्या समूहाला घेऊन काही किलोमीटर अंतर दूर असलेल्या कोकसरला गेले | तेथे त्यांनी केशवजींचे (श्री श्री १००८ श्री बडे दादाजी) रहस्य सर्वांना सांगितले | त्यांचे शिवरूपाचे पद्मासन मुद्रेत दर्शन झाल्यामुळे आयुष्यभर केलेल्या तपस्येचे फळ मिळाले आणि नंतर त्यांनी समाधी घेतली |
असे म्हटले जाते की श्री दादाजी होशंगाबाद मध्ये दिगंबर रूपात रामलालदादाच्या नावाने राहत | तिथे त्यांनी अनेक चमत्कार दाखवले | तेथे ते तीन वर्षे राहिले आणि नंतर त्यांनी विहिरीत आपला देह त्याग केला |
काही दिवसांनंतर पुन्हा सोहागपूरच्या इम्लिया जंगलात ते दिगंबर रूपात एका झाडाखाली धुनीभोवती रममाण होऊन बसलेले दिसले |
गावकऱ्यांच्या आग्रहास्तव नर्मदा किनाऱ्यापासून जवळपास १०-१२ किलोमीटर दूर असलेल्या नर्सिंगपूरला रवाना झाले तेथेही त्यांनी आपले अद्भुत चमत्कार दाखवले आणि काही काळानंतर समाधी घेतली | ते पुन्हा सीसीरी संदुक ग्राम जिल्ह्यात रामफल नावाने प्रकट झाले | जवळपास १९०१ मध्ये ते लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आणि लोकांना पापातून मुक्त करण्यासाठी साईखेडा येथे आले |तिथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले आणि अगणित चमत्कार दाखवले |
साई खेड्यात श्री दादाजी पहिल्यांदा दिसले तेव्हा ते कोणाच्यातरी घराच्या छतावर उभे असलेले दिसले | तेथून ते मातीचे तुटलेले कौल खाली उभ्या असलेल्या मुलांना मारत असत | त्यामुळे मुले गोंधळ करायची आणि म्हणायची, “अरे पगला बाबा आ गया, पगला बाबा आ गया” (पागल बाबा आला , पागल बाबा आला) पण ज्या रोग्याला त्यांनी मारलेला कौल किंवा दगड लागायचा तो रोगातुन मुक्त व्हायचा | साईखेड्यातील मुले श्री दादाजींच्या मागे पुढे फिरायचे आणि त्यांना पागल बाबा म्हणून त्रास द्यायचे | मुलांना दूर पळवण्यासाठी श्री दादाजी हातात एक डंडा (काठी) ठेवू लागले | तेव्हापासून लोक त्यांना ‘डंडेवाले दादाजी’ म्हणू लागले |ज्यांच्यावर त्यांचा हा डंडा पडायचा त्यांचा उद्धार व्हायचा | ते दिवसभर जंगलात किंवा शेतात फिरायचे आणि गाई चारायचे | संध्याकाळी एका सुकलेल्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत बसायचे | एकदा श्री दादाजीनीं त्या सुकलेल्या झाडाच्या लाकडांची धुनी पेटवली आणि तेव्हापासून लोक त्यांना ‘धुनीवाले दादाजी’ असे सुद्धा म्हणू लागले | 30 वर्षांपर्यंत श्री दादाजी साईखेडा आणि त्याच्या आसपासच्याच्या परिसरात फिरायचे आणि जेथे त्यांची इच्छा व्हायची तेथे विश्राम करायचे | ते कधी नर्मदाकिनारी, कधी शेतात, कधी झाडाखाली तर कधी कोणाच्या घरात विश्रांती घ्यायचे |
श्री दादाजींनी कधी संसारिक साम्राज्य स्थापन केले नाही | त्यांची गृहस्थी म्हणजे डंडा, चिमटा, जलपात्र आणि कांबळ अशी अद्वितीय होती |
ज्यांना कुणाला श्री दादाजींकडून शिवी मिळायची किंवा डंडा पडायचा त्याचे कल्याण व्हायचे |याप्रमाणे त्यांची एवढी प्रसिद्धी झाली की एक दिवस स्वतंत्रता सेनानी मदन मोहन मालवीय हे पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना दादाजींकडे दर्शनासाठी घेवून आले | प्रथम महात्मा गांधीजींनी नमस्कार केला | पण जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी नमस्कार केले तेव्हा श्री दादाजी जे सदैव रूद्र रूपात असायचे त्यांनी नेहरूजींना डंडा मारून सांगितले की “यह मोडा लायक है, याहै स्वराज दी है” | (हा व्यक्ती लायक आहे | यांना स्वराज्य दिले) आणि त्यांना आपला डंडा दिला |
सन १९७७ मध्ये इंदिरा गांधी २४ अकबर रोड ए |आय |सी |सी हेडक्वार्टर मध्ये राहत होत्या |तेव्हा श्री श्री १००८ श्री छोटे सरकारजी त्यांना दर्शन देण्यासाठी गेले | आणि इंदोरचे श्री श्री १००८ श्री बडे सरकारजींनी दिलेला मोगऱ्याचा गजरा त्यांच्या हातात बांधून इंदिराजींना सांगितले की इंदोरच्या श्री श्री १००८ श्री बडे सरकारजींनी निरोप दिला आहे की, “आप फिरसे प्रधानमंत्री बनोगी” |(तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री बनाल) त्यावेळेस श्री छोटे सरकारजींनी त्यांना आठवण करून दिली की त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरूजींना साईखेड्यात श्री बडे दादाजींनी डंडा मारून त्यांना तो डंडा दिला होता | इंदिराजींनी ही गोष्ट मान्य केली आणि श्री श्री 1008 श्री छोटे सरकारजींना आपल्या पूजाघरात नेऊन त्यांना तो डंडा दाखवला | इंदिराजींनी सांगितले की, “माझे वडील पंडित जवाहरलाल नेहरू त्या डंड्याला आपल्या काखेत दाबून नेहमी आपल्याजवळच ठेवायचे” | काही महिन्यानंतरच इंदिराजी चिकमगलूर मधून काँग्रेसमधून पूर्ण बहुमताने निवडून पुन्हा एकदा भारताच्या प्रधानमंत्री बनल्या |
सन १९२९ मध्ये श्री दादाजी साईखेड्यातून यात्रेस निघाले | त्यांनी छिपानेर, बागली, उज्जैन, इंदोर, नावघाट खेडी (बडवाह) ची यात्रा करत खंडव्यात आगमन केले |
बागलीत भोपालचे नवाब हमीदुल्लाह खान यांची पत्नी तिरसट होती | ती संताना खूप त्रास द्यायची आणि त्यांची परीक्षा घ्यायची | जेव्हा तिला समजले की नर्मदा किनारी काही साधू आले आहे तर तिने श्री दादाजींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना आपल्या नोकरांच्या हातून एका ताटात मांसाचे तुकडे झाकून पाठवले | जेव्हा श्री दादाजींनी त्या नोकराला येतांना बघितले |तेव्हा ते म्हणाले, “अच्छा हमको आजमाने आया है, बेगम ने भेजा है, नवाबन ने भेजा है, नवाबन की ऐसी की तैसी” (बरं माझी परीक्षा घेण्यासाठी आला आहेस, बेगम ने पाठवले आहे, नवाबनने पाठवले आहे, नवाबन की ऐसी की तैसी) आणि त्यांनी नवाबनला खूप शिव्या दिल्या | दादाजींच्या रूद्र रुपाला पाहून नोकर घाबरला आणि मागे सरकला | दादाजींनी त्याला जवळ बोलावले तर श्री दादाजी आपल्याला डंडा मारतील अशी नोकराला भीती वाटू लागली | श्री दादाजी त्याच्यावर ओरडले की ताट तर देऊन जा आणि श्री दादाजींनी आपल्या डंड्याने ताटाला मारून ताटातील सामान खाली पाडला | तर ताटातून मांसाचे तुकड्याऐवजी गुलाबाची फुले खाली पडली | त्यातील एक फूल उचलून ते ताटामध्ये ठेवून तो नोकर तेथून पळून गेला |
नवाबाच्या बेगमकडे परत आल्यावर त्या नोकराने तिला सर्व हकीकत सांगितली आणि उचललेले गुलाबाचे फुलही तिला दिले | त्या स्त्रीने विचार केला की तिचा नोकर हिंदू असल्यामुळे त्याने मांस काढून फुले नेली असतील | मग तिने पुन्हा एक मांसाचे ताट तयार केले व स्वतः दादाजींजवळ गेली | श्री दादाजींनी तिला बघितले आणि रागात शिव्या देऊ लागले | जेव्हा ती स्त्री थांबली तेव्हा श्री दादाजी सुध्दा शांत झाले | त्यांनी तिला पुन्हा बोलावले व शिव्या देऊ लागले | तिचा हात पकडला आणि म्हणाले, “अच्छा मोडी हमको आजमाने आयी है, हमको आजमाने आयी है?”(बरं माझी परीक्षा घेण्यासाठी आली आहे, माझी परीक्षा घेण्यासाठी आली आहे?) आणि ताटावरून कपडा सरकवला त्यावेळेस ते मांसाचे तुकडे माव्यात बदलले | श्री दादाजी म्हणाले, “अच्छा अभी नही समझेगी, ले खा ले, ले खा ले” ( बरं अजूनही समजणार नाही, घे खा, घे खाऊन घे) जेव्हा तिच्याकडून खाल्ले गेले नाही तेव्हा श्री दादाजींनी आपल्या डंड्याने तिच्या तोंडात आणखी तुकडे ठूसवले | घाबरलेल्या नवाबाच्या बेगमने हात जोडून श्री दादाजींची माफी मागितली आणि म्हणाली, “मी बघितले की तुम्ही तर कोणीतरी औलिया आहात |” हे ऐकून श्री दादाजी तिच्यावर गरजून म्हणाले, “औलिया नही, औलिया के बाप है हम” | आणि तिला सांगितले कि तू आतापर्यंत जेवढे साधु बंदिस्त केले आहेत त्यांना लवकरात लवकर मुक्त कर |
दुसऱ्या दिवशी ती स्त्री आपले पती भोपाळचे नवाब हमिदुल्लाहखान यांच्या सोबत एका बग्गीत बसून श्री दादाजींजवळ आली | त्या दिवशी ते शांत मुद्रेत बसले होते | त्या दोघांनीही श्री दादाजींना आपल्यासोबत घरी येण्यासाठी विनंती केली | श्री दादाजींनी होकार दिला आणि ते त्यांच्या सोबत बग्गीत बसले | बग्गीत बसताच श्री दादाजी पुन्हा शिव्या देऊ लागले आणि त्यांनी बग्गीतून दोघांनाही उतरवून दिले | बग्गी चालवणारा ही घाबरला आणि त्याला सुद्धा खाली उतरवून दिले | जेव्हा त्यांनी बग्गी चालवणाऱ्याला घोड्यांना सोडायला सांगितले तेव्हा नवाबाच्या पत्नीने श्री दादाजींना घोडे न सोडण्याची विनंती केली | श्री दादाजी म्हणाले, “नही! इन घोड़ो ने भी तेरा अन्न खाया है, हटाओ इन घोड़ों को |” (नाही! ह्या घोड्यांनीही तुझे अन्न खाल्ले आहे, सरकवा या घोड्यांना) आणि त्यांनी घोडे हटवून दिले | आपल्यासोबत आलेल्या भक्तांना
श्री दादाजी म्हणाले,”चलो रे मोडा हॉंको, चलो रे मोडा हॉंको, चलो रे मोडा हॉंको |” (चला लोकांनो हकला) आणि घोड्यांऐवजी भक्तांनी बग्गी ओढून दादाजींना तेथून नेले | पुढील बरेच दिवस खंडव्यापर्यंतची यात्रा श्री दादाजींनी त्याच बग्गीतून केली | हा रथ तोच आहे ज्यात श्री दादाजींनी समाधी घेतली होती आणि आजही खंडवा दरबारात हा रथ उभा आहे |
श्री दादाजींनी तीन दिवस खंडव्यात मुक्काम केला | तेथून निघत असताना पार्वतीबाई नावाची सेठानी त्यांच्या रथासमोर येऊन म्हणाली,”मेरे दाल भात का भंडारा खा कर ही जाना पडेगा |” श्री दादाजींनी तिला तीनदा नाही म्हटले की, “मुझे जाने दे मुझे बहुत काम है” | (मला जाऊ दे, मला खूप काम आहेत) पण तिने ऐकले नाही आणि रथासमोर झोपून गेली | फार समजवल्यावरही ती सरकली नाही | तेव्हा दादाजी म्हणाले,”अच्छा भाई हम तो सोते हैं, तेरी तू जान” | (मी तर झोपतो, तुझे तू बघ) पार्वतीबाईंनी रथाच्या बाहेरूनच श्री दादाजींना नैवेद्य लावले आणि श्री दादाजींची उठण्याची वाट बघितली | खूप वेळ झाला तरी श्री दादाजी उठले नाही म्हणून सर्वांनी नैवेद्य प्रसाद म्हणून वाटून खाऊन घेतला | आधीसुद्धा श्री दादाजी २-२,३-३ दिवस झोपलेले असायचे |
दोन दिवसानंतर एक विचित्र, वेड्या सारखा माणूस पोलीस स्टेशनला गेला आणि म्हणाला की, “हे लोक वेडे आहेत | यांच्या श्री दादाजींनी तर समाधी घेतली पण त्यांना हे माहीतच नाही |” जेव्हा त्या पोलिसाने श्री दादाजींच्या रथाजवळ जाऊन ही गोष्ट सर्वांना सांगितली तेव्हा तेथील सर्वजण आपली समस्या घेऊन श्री छोटे दादाजींकडे गेले | लोकांना त्यांच्याकडे येताना बघून श्री छोटे दादाजी तीन वेळेस म्हणाले, “हाॅ हाॅ भैय्या, श्री दादाजी ने समाधी ले ली है, हॉ हॉ भैय्या श्री दादाजी ने समाधी ले ली है, हाॅ हाॅ भैय्या श्री दादाजी ने समाधी ले ली है” | (हो हो श्री दादाजींनी समाधी घेतली आहे, हो हो श्री दादाजींनी समाधी घेतली आहे, हो हो श्री दादाजींनी समाधी घेतली आहे)आणि लोकांसोबत मिळून त्यांनी श्री दादाजींना रथातून बाहेर काढले आणि लाकडाच्या बिछान्यावर झोपवले | श्री छोटे दादाजींनी ती जागा पैसे देऊन खरेदी केली आणि तेथे श्री दादाजींची समाधी बनवली | तेथे त्यांनी जागृत समर्थ अखंड धुनी प्रज्वलित केली | अध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण आणि अखंड ज्योतीने प्रकाशमान असलेल्या, अलौकिक, दिव्य खंडवा दरबाराची स्थापना केली | त्यांनी दरबाराचे 14 नियम बनवले | जसे आरती, पूजा इत्यादी आणि गुरु मर्यादाही शिकवली |त्या नियमांचे दादा दरबारात आजही पालन होते |

श्रीदादाजींच्या लीला
श्री दादाजींचे नाव आगीच्या वेगाप्रमाणे देशभर पसरत होते | ‘श्रीदादाजी शिवरूप आहेत’ हे काशीच्या काही साधूंना सहन झाले नाही | त्यांनी श्री दादाजींची परीक्षा घेण्याचे ठरविले | त्या वेळेस श्रीदादाजी साईखेड्यात होते | श्री दादाजी तर अंर्तयामी होते | त्यांना या गोष्टींचा अंदाज होता | साधूंची टोळी साईखेड्याला पोहोचण्याआधीच श्री दादाजींनी आपल्या समूहातील साधूंना सांगणे सुरू केले होते की, “आज हमारी परीक्षा है, तयार रहो ” | (आज आपली परीक्षा आहे | तयार रहा) जसे काशीचे साधू तेथे पोहोचले, तोच श्री दादाजी जोरजोरात वेदांची अशी भाषा बोलायला लागले की जी श्रेष्ठातल्या श्रेष्ठ विद्वानाला ही कदाचित येत नसेल | हे बघून काशीच्या साधूंना आपल्या विचारांची खूप लाज वाटली आणि ते श्री दादाजींच्या चरणांवर नतमस्तक झाले |
मानवतेसाठी जेव्हा,
श्रीदादाजी प्रगट झाले,
रहस्यमय सर्व प्रश्नांची उत्तरे,
ज्यांचे गुढ राहिले,
ज्यांच्या श्रेष्ठ ज्ञानापुढे,
मोठे मोठे विद्वान थकले |
अशा श्री दादाजींच्या चरणांवर
काशीचे साधू नतमस्तक झाले |
त्याचप्रमाणे एक डॉक्टर, एक वकील आणि एक शिक्षक अशा तीन व्यक्तींनीही श्री दादाजींची परीक्षा घेण्याचा विचार केला | त्यांचे म्हणणे असे होते की जर श्री दादाजी खरच भोलेनाथ आहेत तर त्यांना विष पिण्यास काहीही हरकत नको | ते तिघे श्री दादाजींजवळ फुलांची माळ, मिठाई व आपल्या झोळीत विषाची बाटली घेऊन तेथे पोहोचले | त्या तिघांना बघताच क्षणी श्री दादाजी म्हणाले, “मेरे लिए फुल और मिठाई लाये हो, लाओ लाओ मुझे दो” (माझ्यासाठी फुल आणि मिठाई आणली आहे, आणा आणा, मला द्या)असे म्हणून त्यांच्या झोळीतून विषाची बाटली काढून पिऊन घेतली | हे बघून ते तिघेही आश्चर्यचकित झाले | त्यांनी आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि तेथून निघून गेले |
साईखेड्यात श्री दादाजींनी अशा खूप लीला केल्या | मोठे-मोठे साधु, संत श्री दादाजींच्या दर्शनाला यायचे |
श्री दादाजी बेलाच्या झाडाखाली धूनी रमवून बसायचे | तेथेच एक जिजाबाई नावाची स्त्री शिवजींची मोठी भक्त होती | ती रोज सकाळ-संध्याकाळ जवळच्या शिवमंदिरात पूजेस जायची | एक दिवस तिने मंदिराचे दार उघडले असता तिला शिवजींच्या स्थानी श्री दादाजी दिसले | आश्चर्यचकित होऊन तिने श्री दादाजी नेहमी ज्या ठिकाणी बसतात तेथे बघितले तर तेथे श्री दादाजींच्या जागी तिला शिवजी दिसले |
श्री दादाजींकडे लोक आपल्या इच्छेने यायचे पण जाताना श्री दादाजींची आज्ञा घेऊनच जायचे | सालिग्राम पटेल नावाचा एक व्यक्ती श्रीदादाजींच्या दर्शनाला आला | १७-१८ दिवस झाले तरी त्याला परत जाण्याची आज्ञा मिळाली नाही | श्री दादाजी एकदा रात्री आपल्या समूहासोबत धुनी रमवून बसले होते | तेव्हा अचानक श्री दादाजींनी सालिग्रामला नर्मदेतून पाणी आणून धुनीत टाकायला सांगितले | त्याने असे केल्यानंतर श्री दादाजींनी त्याला रागात शिव्या दिल्या आणि म्हणाले “कबसे यहा पडा है, घर जा” | (कधीचा इथे पडला आहे,जा घरी जा) सालिग्राम गोंधळलेल्या स्थितीत आपला सामान घेऊन तेथून निघाला | रात्र झाल्यामुळे त्याला परत जाण्यासाठी कोणतेही साधन मिळत नव्हते परंतु दादाजींच्या आज्ञेनुसार कसे तरी तो आपल्या गावाला पोहोचला | तेथे पोहोचल्यावर तेथील परिस्थिती बघून तो बेचैन झाला | त्याचे पूर्ण गाव आगीत जळून खाक झाले होते परंतु केवळ त्याचेच घर या आगीपासून वाचले होते | विचारपूस केली असता त्याला कळाले की ज्या वेळेस त्याचे घर सोडून इतर घरांना आग लागली होती त्यावेळेस श्री दादाजी त्याच्याकडून धुनीत पाणी टाकत होते |
श्री दादाजींचे लहान मुलांवर खूप प्रेम होते | एकदा एक मुलगा रात्री रस्त्यावर बसून पथदिव्यांच्या उजेडात अभ्यास करत होता |त्याला एका हवालदाराने पकडून जेल मध्ये बंद केले | जेव्हा दादाजींना हे कळाले तेव्हा श्री दादाजींना हे सहन झाले नाही | त्यांनी आपल्या डंड्याने पथदिवे फोडून टाकले | हवालदाराने त्यांना पण मुलासोबत जेलमध्ये बंदिस्त केले आणि बंद करून जेव्हा तो हवलदार बाहेर आला तर त्याला बाहेर श्री दादाजी हातात डंडा घेऊन सडकेवर उभे राहून त्याच्याकडे हसत बघत असल्याचे दिसले | बैचेन होऊन हवलदार आत मध्ये गेला | त्याला श्री दादाजी तिथे त्या मुलासोबत बंदिस्त दिसले | पुन्हा बाहेर येऊन बघितले तर श्री दादाजी बाहेर दिसले | मग त्याने कान पकडून श्री दादाजींची माफी मागितली आणि मुलाला सोडून दिले |
साईखेड्यात एक निर्धन स्त्री श्री दादाजींकडे आपले दुःख सांगण्यास आली | ती गरीब असल्यामुळे तिच्या तरुण मुलीचे लग्न करू शकत नव्हती | तिचे म्हणणे ऐकून मी उद्या सकाळी तुझ्या घरी येईल असे श्री दादाजींनी त्या स्त्रिला सांगितले | दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी श्री दादाजी त्या स्त्रीकडे गेले तेव्हा त्या स्त्रीने नमस्कार केला | “बाजू हट, मुझे टट्टी करनी है” | (बाजूला सरक, मला संडास करायची आहे) असे सांगून श्री दादाजी तिच्या स्वयंपाकघरात गेले आणि तिच्या चुलीवर बसून संडास केली | ते म्हणाले याला राखेने झाकून दे |
तिचा नवरा घरी आल्यावर नाराजीने म्हणाला की, “तुझ्या गुरुंना हीच जागा मिळाली होती का संडास करायला? हे फेक आणि चूल साफ कर |”जेव्हा ती स्त्री राखेने झाकलेली संडास उचलू लागली तर ती वजनदार वाटली | तिने बघितले तर संडास सोन्यामध्ये परीवर्तित झालेली होती | त्या दोघांनी ते धुवून प्लेटमध्ये टाकून ती प्लेट सोबत घेऊन श्री दादाजींकडे गेले | श्री दादाजींनी त्यांना दुरुन येताना बघितले आणि म्हणाले, “मुझे क्यों दिखाती है? जा जाकर अपने बेटी की शादी कर” | (मला का दाखवते? जाऊन आपल्या मुलीचे लग्न कर) जेव्हा ते दोघं श्री दादाजींजवळ आले तेव्हा श्री दादाजी रागात म्हणाले, “तुम्हे समझ नही आता? ये मैंने तुम्हारी बेटी की शादी के लिए किया है” | (तुम्हाला समजत नाही का? हे मी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी केले आहे) त्या दोघांनी सोन्याच्या एका तुकड्यात मुलीचे लग्न केले आणि उरलेल्या सोन्याचे दागिने बनवले | ज्या मुलीचे लग्न झाले त्यांच्या घराण्यात आजही ते सोन्याचे दागिने आहेत |
श्री दादाजी आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढण्याची अशी अनेक उदाहरणे आहेत | श्री दादाजी अवधूत संत आहेत | अलौकिक लीला रचणारे, विचित्र रहस्यपूर्ण मार्गावर चालणारे, न कपट न प्रलोभन, न धर्म-पंथ न संप्रदाय, न उपवास न प्रार्थना, न धर्म विशेषचा प्रचार न बंधन, न मित्र न कोणी शत्रू, न उच्च न नीच, सर्वांप्रती समभाव ठेवणारे अवधूत अर्थात आत्मबोध प्राप्त, संसाराच्या आकर्षण विकर्षणातून मुक्त, आदी मध्य अंतपर्यंत पूर्णतः शुद्ध, भूत-वर्तमान-भविष्य जाणणारे, असे दादाजी अलमस्त असायचे |
श्री दादाजी असे महान संत होते की ज्यांना जनकल्याणासाठी कधी वेद, शास्त्र आणि मंत्राची आवश्यकता भासली नाही | लोकांना संकटातून बाहेर काढण्याची त्यांची आपली एक वेगळीच शैली होती | ते भक्तांना शिव्या देत, डंडा मारत आणि त्यांचे दुःख दूर करत | त्यांच्या डंडाचा मार घेण्यासाठी भक्तांची गर्दी जमलेली असायची | परंतु असे सौभाग्य काही भाग्यशाली लोकांनाच मिळाते |
तिन्ही लोकांची संपत्ती देऊन,
नाही उपकार चुकवू शकत,
अविरत वाहत्या या गंगेला,
कोणी नाही रोखू शकत |
सांगणाऱ्यांनो काहीही सांगा हे तर आमचे दादाजी आहेत धुनिवाले, डंडेवाले, माधव, केशव, रामफल आहेत |
असे आहेत आमचे प्रिय श्री दादाजी धुनीवाले |
|| जय श्री दादाजी की ||