श्री छोटे दादाजी

श्री दादाजी धुनिवाले यांच्या परंपरेत श्री बडे दादाजी महाराजांना शिवजींचे अवतार आणि श्री छोटे दादाजींना विष्णूचे अवतार मानले जाते | खंडवा दरबारात श्री दादाजी महाराजांच्या समाधी जवळच श्री छोटे दादाजींची समाधी स्थापित आहे | त्यांचा परिचय श्री दादाजी महाराजांशी पहिल्यांदा साईखेड्यात झाला होता | श्री छोटे दादाजी राजस्थानचे राहणारे होते | ते अठरा वर्षांपेक्षा कमी वयातच गुरूंच्या शोधार्थ घर सोडून निघाले | काशीकडे जातांना त्यांनी ट्रेनमध्ये श्री बडे दादाजी महाराजांचे वर्णन ऐकले आणि प्रभावित झाले | श्री बडे दादाजींच्या दर्शनासाठी व्याकूळ होऊन मुंबईला उतरून साईखेड्याकडे पायी निघाले |
साईखेड्यात जेव्हा त्यांनी श्रीदादाजींचे दर्शन केले तेव्हा त्यांना आपल्याला गुरु मिळाल्याची दिव्य अनुभूती झाली | जेव्हा त्यांनी श्रीबडे दादाजींना नमस्कार केला तेव्हा श्रीबडे दादाजींनी त्यांना त्यांची पगडी मागितली आणि त्यांना टिक्कड प्रसाद दिला | दोन तीन दिवसानंतर जेव्हा श्री छोटे दादाजींनी श्री बडे दादाजी महाराजांना नमस्कार केला तेव्हा श्रीबडे दादाजींनी त्यांच्या डोक्यावर इतक्या जोरजोरात डंडे मारले की त्यातून रक्त येऊ लागले आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले | श्रीबडे दादाजींनी त्यांना एका कोठीत बंद करून कुलूप लावून किल्ली आपल्या जवळ ठेवून घेतली | काही दिवसानंतर शिष्यांना श्रीछोटे दादाजींची चिंता वाटू लागली | श्री बडे दादाजींचे भक्त भ्रमचारीजींनी श्रीछोटे दादाजींना बाहेर काढण्याची विनंती केली | भक्तांनी खोली उघडली आणि श्री छोटे दादाजींचे सुस्त शरीर श्री बडे दादाजी महाराजांसमोर आणले | स्वतः श्री बडे दादाजींनी त्यांच्या जखमांवर बसलेल्या कीड्यांना धुनीच्या चिमट्याने काढले | त्यावर रक्षा लावून आपल्या लोट्याने पाणी पाजले व जेवू घातले | असे वाटत होते की जणू काही श्रीबडे दादाजींनी श्री छोटे दादाजींच्या शरीरात एका दिव्यआत्म्याचा प्रवेश करून त्यांना नवीन जन्म दिला आहे | श्री बडे दादाजी महाराजांनी श्रीछोटे दादाजींना सांगितले की, “कड़ी‌ के कड़ाई कड़ जाना, पकौड़े के माफिक अटक मत जाना| अब यह मोड़ा मेरा है, मेरा हरिहर है” | तेव्हापासून त्यांचे नाव हरिहर भोले भगवान, हरिहरानंद ठेवले आणि सर्वांना सांगितले की यांना श्रीछोटे दादाजी म्हणायचे ” |
1930 मध्ये श्री छोटे दादाजी महाराज खूप अस्वस्थ झाले तेव्हा श्री बडे दादाजी महाराजांनी एक मण मिरचीने (40 kg) त्यांची नजर काढली | आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की एवढी मिरची जळाल्यानंतर देखील तेथे बसलेल्या शंभर-दोनशे लोकांपैकी कोणालाही खोकला आला नाही किंवा मिरच्यांमुळे कोणाच्याही नाका-डोळ्याला त्रास झाला नाही |
श्रीबडे दादाजींसारख्या महाराजांचे शिष्यत्व मिळाल्याने श्रीछोटे दादाजींमध्ये अलौकिक शक्ती आली | ते श्रीबडे दादाजींप्रमाणे आपल्या भक्तांचे आध्यात्मिक, मानसिक आणि व्यापक रूपात कल्याण करू लागले | श्रीछोटे दादाजींचा स्वभाव श्रीबडे दादाजींच्या एकदम विपरीत होता | जिथे श्री बडे दादाजी महाराज शिव्या व डंडा मारून लोकांचे कल्याण करायचे तिथे श्रीछोटे दादाजी मोठ्या प्रेमाने सहजरित्या लोकांना समजावून त्यांचे कल्याण करायचे |
चन्दनं शीतलं लोके ,चन्दनादपि चन्द्रमाः |
चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला गुरूसंगतिः ||
चंदन सर्वात शितल आहे | चंदनापेक्षाही शितल चंद्रमा आहे | चंद्र आणि चंदनापेक्षाही शितल गुरु श्रीहरिहरजी आहेत |
जेव्हा भक्तांना श्रीबडे दादाजींचा डंडा किंवा शिवी मिळायची तेव्हा ते श्रीछोटे दादाजींना त्याचा अर्थ विचारण्यास जायचे | श्रीछोटे दादाजी त्यांना श्रीबडे दादाजींच्या डंडा आणि शिवीमुळे अडचणी कशा दूर झाल्या याचे रहस्य सांगायचे | श्रीछोटे दादाजींचा स्वभाव इतका सरळ होता की भक्तांनी प्रेमाने दिलेले कोणतेही वस्त्र ते आनंदाने धारण करायचे मग तो कोट असो, शेरवानी असो, बूट असो, मोजे असो, मुकुट किंवा टोपी असो | श्रीछोटे दादाजींना श्वसनाचा त्रास होता म्हणून बंगालच्या आसनसोल च्या एका भक्ताने हाताने ओढली जाणारी रिक्षा आणली आणि तो त्यात श्रीदादाजींना बसवून पूर्ण दरबार फिरवायचा | श्रीछोटे दादाजींजवळ ग्रामोफोन सुद्धा होता | त्याला ते स्वतः खूप आवडीने ऐकायचे आणि भक्तांना विशेषतः लहान मुलांच्या फौजेला ऐकवायचे | श्रीछोटे दादाजींना मुलांबद्दल इतके प्रेम असायचे की ते मुलांना आपल्या अंथरूणाजवळच खाली झोपवायचे | जेव्हा श्री छोटे दादाजींसाठी नैवेद्याचे ताट यायचे तर ते स्वादिष्ट व्यंजनांनी भरलेले ताट मुलांसाठी खाली सरकवून द्यायचे | बरेच वेळा ते मुलांमध्ये असे मिसळून जायचे की बघणाऱ्यांना वाटायचे की तेच मुलांपेक्षा लहान आहेत |
डिसेंबर 1930 मध्ये श्रीबडे दादाजींनी समाधी घेतल्यानंतर श्रीछोटे दादाजींनी आपले भक्त शंकरलाल गुप्ता जे एक वकील होते त्यांना सांगितले की, “पता करो यह जमीन किसकी है, हम उनकी यह जमीन खरिदकर श्री दादाजी की समाधी इसी स्थान पर बनाऐंगे” | (ही जमीन कोणाची आहे त्याचा तपास करा |त्यांच्याकडून ही जमीन विकत घेऊन श्रीदादाजींची समाधी येथेच बनवू) ती जमीन भायती परिवाराची होती | भायती परिवाराकडून जमीन खरेदी केल्यानंतर श्रीछोटे दादाजींनी समाधीचे कार्य सुरू केले | त्यांनी आपल्या राजआनंद नावाच्या एका भक्ताला श्रीदादाजींच्या समाधीची चुनाई करण्यास सांगितले | श्री बडे दादाजी महाराज मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला ब्रह्मलीन झाले आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्यांना समाधीत विराजमान करण्यात आले | श्रीबडे दादाजी ब्रम्हलीन झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक शक्तीमुळे श्री छोटे दादाजी त्यांचे उत्तराधिकारी बनले |
खंडवा दरबारात आधी दत्ताची मोठी आरती व्हायची | आपण तर नर्मदा खंडी आहोत असे भक्तांना सांगून श्रीछोटे दादाजींनी त्याऐवजी नर्मदेची आरती सुरू केली | त्यासोबत दादा नाम आणि मंत्रोपचार प्रत्येक दरबारात सुरू केले |
श्रीछोटे दादाजी आपल्या लुगर दादा नावाच्या एका शिष्याच्या पायजाम्याच्या खिशात चामड्याचे बूट ठेवायचे | चामड्याचे बूट खिशात असल्यामुळे ते नेहमी मंदिराबाहेरूनच नमस्कार करायचे | श्रीछोटे दादाजी तसे खूप शांत व सरळ स्वभावाचे होते परंतु कोणत्याही शिष्याने नियमाचे उल्लंघन केल्यास ते लुगर दादाला त्या शिष्याला चामड्याच्या बूटाने मारायला सांगायचे | मोठ-मोठे राजे-महाराजे दर्शनाला यायचे तर तेसुद्धा सर्वसामान्यांसारखे भांडारघरात सेवा करायचे |
श्रीबडे दादाजींनी समाधी घेतल्यानंतर काही लोकांनी श्रीछोटे दादाजी महाराजांना उत्तराधिकाऱ्याच्या रूपात स्विकारायला नकार दिला आणि ते श्रीछोटे दादाजींना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ लागले | त्यापैकीच एका न्हाव्याने श्री छोटे दादाजी महाराजांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये खोटी तक्रार नोंदविली | लुंबा नावाचा सुपरिटेंडेंट श्रीछोटे दादाजींना अटक करायला दरबारात आला | त्यावेळेस आरती चालू होती |त्याने लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला | एवढेच नव्हे तर त्याने आपल्या बंदुकीतून दोन गोळ्या चालवल्या | त्यापैकी एकीचा नेम चुकला आणि दुसरी श्रीछोटे दादाजींच्या कानाच्या अगदी जवळून जाऊन भिंतीला लागली | या घटनेनंतर श्रीछोटे दादाजींनी खंडव्यात राहण्यास नकार दिला आणि होशंगाबाद कोर्टातून केस चालवली | या केसचा निकाल लवकर लागावा म्हणून श्री छोटे दादाजींनी कोर्टात जास्त फी भरली | 1938 मध्ये श्रीछोटे दादाजी ती केस जिंकले आणि सुपरिटेंडेंट लुंबा वर 80000 चा दंड ठोठवला | केस जिंकल्यावर श्रीछोटे दादाजी पुन्हा खंडव्यात आले आणि त्यांनी 80000 धुनीत टाकून दिले |
एकदा श्री छोटे दादाजींच्या विरुद्ध रायट केस मध्ये एक व्यक्ती चुकीची आणि खोटी साक्ष देणार होता | ज्यामुळे केस उलट होऊ शकत होती आणि श्रीछोटे दादाजींना त्रास झाला असता | श्रीछोटे दादाजींनी आपले वकील राधाकिसन गुप्ताला सांगितले की, “केस की सुनवाई आठ दिन आगे बढ़ा दो” | (केसची सुनावणी आठ दिवस पुढे करा) गुप्ताजी म्हणाले, “केस शेवटच्या स्तरावर आहे |त्यामुळे हे शक्य होणार नाही परंतु प्रयत्न करतो ” | श्रीछोटे दादाजींच्या कृपेने केस आठ दिवस पुढे ढकलली गेली आणि आश्चर्याची गोष्ट ही की सहाव्या दिवशी जी व्यक्ती खोटी साक्ष देणार होती तिचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला |
श्री छोटे दादाजींच्या भक्तांमध्ये अनेक भक्त राजवाड्यांचे राजा असायचे | जसे होळकर घराण्यातील तुकोजीराव होळकर, सोहावलचे वीरेंद्र बहादुर सिंह, धारजवळचे गुड़ी नरेश आणि बाराबंकीचे राजा |
सुनते सबकी मन की बाते,
ये तो चैतन्य देवता है|
राजा जिनके चरण पूजते,
श्रीदादाजी वो महाराजा है|
सिद्धो की बस्ती में भी जाकर,
डाला जिन्होंने डेरा है|
श्रीदादाजी के वंदन से,
मिटे जगत का फेरा है|
श्री छोटे दादाजींच्या सेवेत त्यांचे भक्त विविध प्रकारच्या भेटवस्तू द्यायचे | स्नानासाठी लागणारे अत्तर कन्नौजच्या भक्ताकडून यायचे | रायपूरचे गोपी किशन सेठ भांडारघरात पुजेसाठी लागणारे तांदूळ त्याकाळच्या रेल्वेची एक पूर्ण बोगी भरून पाठवायचे | इलाहाबादच्या विश्वनाथ चौधरींनी एक काळ्या रंगाची फोर्ड गाडी आणि होळकर घराण्याचे दिवान पांडे साहेबांनी प्लायमाउथ गाडी दिली होती | ह्या गाड्या अजूनही खंडवा दरबारात उभ्या आहेत | जेव्हा श्रीछोटे दादाजी लांबच्या प्रवासासाठी निघायचे तेव्हा सोहावलचे महाराज वीरेंद्र बहादुर सिंह स्वतः येऊन त्यांची गाडी चालवायचे | जेव्हा श्रीछोटे दादाजींना झोप यायची तेव्हा ते गाडी इतक्या हळू चालवायचे की जेणेकरून श्री छोटे दादाजींची झोपमोड होत नव्हती |
श्रीछोटे दादाजींनी भारतात अनेक शहरांच्या यात्रा केल्या जसे दिल्ली, इलाहाबाद, डेहराडून, मुलताई, नागपूर, बैतूल, मुंबई, पुणे, इंदोर, उज्जैन इत्यादी |
उज्जैनचे दत्त आखाड्याचे महंत जेव्हा ब्रह्मलीन झाले, तेव्हा श्री छोटे दादाजींनी त्यांच्या गादीवर सन्यपुरी महाराजांना बसवले आणि अनेकदा उज्जैनची यात्रा करून त्यांना दर्शन द्यायचे |
एकदा श्री छोटे दादाजी त्यांचे भक्त किशन मिस्त्री यांच्याबरोबर ओंकारेश्वरची यात्रा करत होते | तेव्हा तेथील सिद्धनाथ मंदिर त्यांना खूप आवडले आणि त्यांनी असेच भव्य मंदिर खंडव्यात उभारण्याची इच्छा व्यक्त केली | त्यांनी किशन मिस्त्रींना तेथेच काही दिवस थांबवून मंदिराचा नकाशा बनवण्याचा आदेश दिला | त्यांनी बनवलेला नकाशा श्रीदादाजींना फार आवडला आणि त्यांनी मंदिर बनवण्याची आज्ञा दिली | रायपूरच्या गोपी किसन सेठ ने जे रेल्वेची बोगी भरून तांदूळ पाठवायचे त्यांनी मंदिराची सेवा करण्याची इच्छा श्रीदादाजींजवळ प्रकट केली तेव्हा श्रीछोटे दादाजी म्हणाले, “ठिक है,जैसी आपकी ईच्छा” | (ठीक आहे जशी तुझी इच्छा) जेव्हा रेल्वेतून लाल दगड यायला लागले तेव्हा लोक म्हणायचे की गोपीचंद किशन मंदिर बनवत आहे तेव्हा दादाजी म्हणाले,”नही हम सफेद मार्बल से ही मंदिर बनायेंगे” | (नाही आम्ही पांढऱ्या दगडाचेच मंदिर बनवू) त्यांनी आपले भक्त श्री बडे सरकारजी, इलाहाबाद चे पृथ्वीराज चंदनआणि काही भक्तांना मंदिर व बडे दादाजींच्या समाधीसाठी पांढऱ्या मार्बलबद्दल विचारपूस करण्यासाठी मकरानाला पाठविले | मंदिराचा पाया खोदला आणि त्यासाठी काळा दगड खाणीतून आणला | खंडवाजवळच्या जसवाडीहून बैलगाडीत श्रीदादाजींचे भक्त शंकरराव आसकर आणि राजाआनंद खाणीतून खडी फोडून आणायचे | बैलगाडी चालवणारे रामदासजी महाराज होते | ज्यांनी नंतर दिल्ली दरबाराची स्थापना केली |
1942 ला जेव्हा श्रीछोटे दादाजी इलाहाबादच्या कुंभमेळ्यासाठी जाऊ लागले तेव्हा त्यांनी शंकरराव आसकर यांना बोलावून सांगितले की, “आप खडी की सेवा करते रहो” | (तुम्ही खडीची सेवा करत रहा) श्रीछोटे दादाजींनी राधाकृष्ण गुप्ताजवळ मंदिर निर्माणासाठी 90 हजार रुपये ठेवले होते | त्याच पैशांनी शंकरराव आसकर खडी आणायचे |
4फेब्रुवारी 1942 ला इलाहाबादच्या कुंभमेळ्यात श्रीछोटे दादाजींनी समाधी घेतली आणि त्यांचे प्रथम भक्त श्री इंदोर सरकारजींनी वीस भक्तांना सोबत घेऊन श्री छोटे दादाजींना खंडवा आणले | मंत्रोपच्चाराने श्री छोटे दादाजींची समाधी श्री बडे दादाजींच्या समाधीजवळ बनवली |
श्री छोटे दादाजींच्या लीला
श्री छोटे दादाजी सव्वा मणचा (50 किलो) हलवा आणि सव्वा मणची खीर बनवायचे | यामुळे भंडारा तयार करणाऱ्या भक्तांना चिंता वाटायची की एवढा प्रसाद कोण खाईल, फेकावा तर लागणार नाही? परंतु योगायोगाने जेव्हा-जेव्हा श्री छोटे दादाजी जास्त प्रसाद बनवायचे त्या दिवशी श्री दादाजींच्या दर्शनासाठी भक्तांची खूप गर्दी व्हायची आणि प्रसाद पूर्णपणे संपायचा |
खंडव्यात श्री छोटे दादाजींच्या सेवेत पांडूर्णाचे एक भक्त होते | त्यांची पत्नी गर्भवती होती | जेव्हा त्यांना घरून फोन आला की त्यांना मुलगी झाली तेव्हा ते श्री छोटे दादाजींजवळ गेले आणि म्हणाले, “तुम्ही सांगितले होते की मुलगा होईल पण मुलगी झाली ” | तेव्हा श्रीछोटे दादाजी म्हणाले की, “अरे नही ,नही बेटा हुआ है तू देख” | (अरे नाही, नाही मुलगा झाला आहे तू बघ) त्याने आपल्या घरी तसा निरोप पाठवला आणि घरातील व्यक्तींनी पुन्हा बघितले तर आश्चर्याची गोष्ट अशी की मुलगी नसून मुलगा होता | कारण त्यांनी श्रीछोटे दादाजींची फार भावपूर्ण सेवा केली होती | फलस्वरूप श्रीछोटे दादाजींनी त्यांच्या मुलीला मुलात रूपांतरित करून दिले | त्या भक्ताचे दोन्ही मुलं भगवंतराव आणि शिशराव पटेल श्रीदादाजींच्या सेवेत क्रमाक्रमाने सहा-सहा महिने त्यांच्या जवळ राहायचे | जेव्हा एक भाऊ सेवा करायचा तेव्हा दुसरा घर गृहस्थी आणि कामे सांभाळायचा | त्यांनी आपल्या आई-वडिलांप्रमाणे श्रीछोटे दादाजींची खूप सेवा केली |
एकदा एका स्त्रीला श्रीछोटे दादाजींना आंबे भेट म्हणून द्यायचे होते पण गरीब असल्यामुळे ती रिकाम्या हातीच दर्शनाला आली | त्या स्त्रीला आशीर्वाद देत श्री छोटे दादाजी म्हणाले की, “मेरा आम कहा है?” (माझे आंबे कोठे आहे?) आपली गरिबी लपवत ती म्हणाली की, “आंबे घरीच विसरली ” | हे ऐकून श्री छोटे दादाजींनी आपल्या उजव्या पायातून मोजा काढून त्या स्त्रीला दिला आणि म्हणाले की, “तुम पैसा इसमे रखा करो” | (तू यात पैसे ठेवत जा) त्या दिवसापासून त्या स्त्रीला पैशांची कधी कमतरता भासली नाही | आजही त्या परिवाराजवळ तो मोजा आहे |
एकदा एक स्त्री खंडव्यात दुष्काळ पडल्याने श्री छोटे दादाजींजवळ आली आणि म्हणाली की, “तुम्ही जर देव असाल, तर पाऊस पाडा ” | श्री छोटे दादाजी म्हणाले की, “मै तो एक संन्यासी हू, मै कैसे तेरी इच्छा पुरी कर सकता हु” | ( मी एक संन्यासी आहे | मी तुझी इच्छा कशी पूर्ण करेल?) नाराज होऊन ती स्त्री तेथून निघून गेली | ती गेल्यानंतर श्री छोटे दादाजींनी हवन केले आणि बघता बघता पूर्ण खंडव्यात तीन दिवस आणि तीन रात्री पाऊस झाला आणि सगळे आड पाण्याने भरून गेले |
एकदा श्री छोटे दादाजींनी आपले शिष्य श्री बडे सरकारजींना सांगितले की, “जावो तुम्हे होलकारी दी ” | त्यांनी समाधी घेतल्यानंतर श्री बडे सरकारजींनी इंदोर मध्ये तपस्या केली | तर त्यांच्या सेवेत होळकर आणि त्यांचा परिवार आला | याप्रमाणे श्री छोटे दादाजींची वाणी खरी ठरली |