श्री भगवान शिवजींनी मैकल पर्वतावर कठोर तप केले असा शास्त्रात उल्लेख आहे | तपश्चर्या करतांना शिवजींच्या शरीरातून स्वेद (घाम) निघाला | अशा या रुद्र शरीरातून निघालेला श्वेत (पांढरा) घाम पर्वताला भिजवत होता | त्यापासूनच महान पुण्यशीला माँ नर्मदेची उत्पत्ती झाली | माँ नर्मदेची अनेक नावे आहेत | नर्म ददाति इति नर्मदा आनंद किंवा हर्ष उत्पन्न करणारी, महादेवाच्या शिरावर स्थित असलेल्या चंद्राच्या कलेपासून प्रकट झाल्यामुळे – सोमोदभवा, भगवान शिवजींच्या जटांमध्ये स्थित असल्याने-जटाशंकरी, खळखळाट करून वाहत असल्याने – रेवा, नर्मदेचा प्रवाह मैकल पर्वतात वेगवान होत असल्यामुळे – मैकल कन्या,इत्यादी | अशा वेगवेगळ्या नावाने नर्मदा नदी ओळखली जाते |
माँ नर्मदेचा उगम अमरकंटक(ॠक्षशैल पर्वत) येथून झाला आहे | नर्मदा तटावर 67 करोड 67 हजार तीर्थ आहेत | विश्वातील नद्यांपैकी फक्त माँ नर्मदेच्या परिक्रमेचे विधान आहे | नर्मदा पुराणाला आधार मानून परिक्रमा तीन वर्षे-तीन महिने-तेरा दिवसात पूर्ण करण्याचे विधान आहे | माँ नर्मदेच्या परिक्रमेचे विधान सनातन धर्मापासून चालत आले आहे |माँ नर्मदेची परिक्रमा संत आणि सामान्य लोक अनेक वर्षांपासून करत आले आहेत | श्री गौरीशंकरजी, श्री बडे दादाजी, श्री छोटे दादाजी, श्री बडे सरकारजी आणि त्यानंतर आता श्री छोटे सरकाजींनी ही परंपरा चालू ठेवली आहे |
श्री छोटे दादाजी सांगायचे की यमुना नदीत सात दिवस, सरस्वती नदीत तीन दिवस आणि गंगा नदीत एक दिवस स्नान केल्याने प्राणी पवित्र होतात परंतु माँ नर्मदेच्या केवळ दर्शनानेच प्राणी पवित्र होतात | एकदा श्री छोटे दादाजी आपल्या एका भक्तासह ओंकारेश्वरला नर्मदेत स्नान करीत होते | त्यावेळी त्या भक्ताच्या हातात दिव्य सुंदर पितळी मूर्ती आली | श्री छोटे दादाजी म्हणाले की, “यही हमारी कुलदेवी माँ नर्मदा मैया है|” (हीच आमची कुलदेवी माँ नर्मदा आहे) त्यांनी मूर्तीला खंडव्याला आणून कोठार घरात ठेवले | सन 1975 मध्ये खंडव्यात दादा दरबार बनल्यावर तेथे त्या मूर्तीला स्थापित केले | नर्मदा तट हे आदी शंकराचार्यांपासून अखंडीतपणे आज पर्यंत आध्यात्मिक सिद्धी आणि साधनेचे केंद्र बनले आहे | नर्मदा तटावर अनेक संतांनी तपस्या केली आणि आजही करत आहेत | मार्कंडेय पुराण व स्कंध पुराणातील नर्मदा खंड असे प्रमाणित करते की नर्मदा तट ही तपोभूमी आहे | स्कंधपुराणातील रेवा खंडातच सत्यनारायणाची कथा सुध्दा येते आणि त्या अनुषंगाने अखिल विश्वात सत्यनारायण व्रत करतात | त्यानिमित्त्ताने कथेच्या रूपात माँ नर्मदेचे स्मरण होते | श्री दादाजींचे पुजन करणाऱ्या भक्तांसाठी मॉं नर्मदा कुलदेवी आहे | त्यानुसारच सर्व दादाजी दरबारांमध्ये माँ नर्मदेचीच पूजा केली जाते |